"त्या प्रकरणावर मला सभागृहात भाषण करण्याची संधी द्या"
मुंबई : खरा पंचनामा
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जवळपास तीन महिन्यानंतर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. याच कनेक्शनमुळे सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
पण धनंजय मुंडेंनी अद्याप राजीनामा दिला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, यासाठी दबाव होता, मात्र मुंडेंनी राजीनामा दिला नव्हता. आता अखेर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी रात्री उशिरा अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस दाखल झाले होते.
यावेळी बंगल्यावर अजित पवारांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे उपस्थित होते. चारही नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मुंडे यांच्या राजीनाम्यावर फायनल निर्णय घेतला. त्यानंतर अखेर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले पीए प्रशांत जोशी यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील तातडीने राजीनामा मंजूर करून हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी पक्षाकडे त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. या सगळ्या प्रकरणावर सभागृहात भाषण करण्याची संधी द्यावी, अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. सध्या राज्यात विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटोज समोर आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी सभागृहात भाषण करण्याची इच्छा व्यक्त केलीय. मात्र त्यांच्या इच्छेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडून अजून होकार किंवा नकार आलेला नाहीय. त्यामुळे मुंडे सभागृहात भाषण करणार की नाही, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी अजित पवार गटाकडून सावध पावलं उचलली जात असल्याचं दिसत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.