Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेची लाट, 'या' जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेची लाट, 'या' जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा



मुंबई : खरा पंचनामा

संपूर्ण देशात हवामानात बदल पाहायला मिळत असून महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ झाली आहे, तर उत्तर भारतात पर्वतीय भागांत बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामानातील असे अचानक बदल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थोडा ढगाळ वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा आणि मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये दुपारी उकाडा असह्य होत आहे.

मागच्या आठवड्यात पुण्यात कमाल तापमान 36.6 अंश सेल्सिअस, तर मुंबईत 34.6 अंश सेल्सिअस इतकं दिसून आलं. मुंबईसह उपनगरांमध्ये दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण असले तरी उन्हाचे चटके कायम आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासांत तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

देशाच्या उत्तर भागात मात्र हवामानाची स्थिती पूर्णतः वेगळी आहे. इराणमार्गे येणाऱ्या नव्य पश्चिमी झंझावातमुळे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गिलगिट, बाल्टीस्तान, लडाख आणि काश्मीर खोऱ्यात पुढील 24 तासांत हिमवृष्टी सुरू होणार आहे. या भागात जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.