'हड मी नाही पिणार, त्या पाण्यात सगळे अंग घासून...'
पुणे : खरा पंचनामा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाकुंभमेळ्यातील स्नानावरुन खिल्ली उडवली आहे. तसंच बाळा नांदगावकर यांनी आपल्यासाठी तेथील पाणी आणलं असता पिण्यास नकार दिल्याचा खुलासाही केला. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मनसेचा आज 19 वा वर्धापन दिन असून यानिमित्ताने चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं.
"मुंबईत त्या दिवशी बैठक ठेवली होती. त्या बैठकीला शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष हजर झाले नाहीत. मग हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला कारण विचारलं. त्यातील पाच सहा जणांनी कुंभला गेला होतो सांगितलं. त्यांना म्हटलं मग गधड्यांनो पापं कशाला करता. आल्यावर आंघोळ केलीस का हेदेखील विचारलं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं हड मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावर व्हिडीओ पाहतोय तिथे आलेल्या बाया, पुरुष अंग घासतायत. आणि बाळा नांदगावकर म्हणतात साहेब हे गंगेचं पाणी घ्या, कोण पिणार ते पाणी?," अशी खिल्ली राज ठाकरेंनी उडवली.
पुढे ते म्हणाले, 'आताच करोना गेला आहे. कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. दोन वर्षं तोंडाला फडके बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करत आहेत. मी कित्येक स्विमिंग पूल पाहिले आहेत, जे उद्घाटनाला निळे होते नंतर हिरवे झाले. कोण जाऊन त्या गंगेत पडणार आहे. त्याने तिथे काय केलं, मी इथे पितोय. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही".
"या देशातील एक नदी स्वच्छ नाही. आम्ही काय नदीला माता म्हणतो. परदेशात जातो तेव्हा स्वच्छ नद्या पाहतो. ते काय तिथे माता म्हणत नाहीत, तरी नदी स्वच्छ असते. आमच्याकडे सगळं प्रदूषणाचं पाणी नदीत जातं. कोणी आंघोळ करतं, कोणी कपडे धुतं, जे वाटेल ते चालू आहे. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. मधे राज कपूर यांनी चित्रपट काढला, लोकांन वाटलं गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा," असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.