विधान परिषद पोटनिवडणुकीत एक अर्ज बाद
महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध, औपचारिक घोषणा बाकी
मुंबई : खरा पंचनामा
पाच जागांसाठी जाहीर झालेली विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. सहापैकी 1 अर्ज बाद झाल्याने आता 5 जागांसाठी 5 अर्जच शिल्लक आहेत. बाद झालेल्या अर्जासोबत 10 आमदारांच्या सूचक आणि 10 आमदारांच्या अनुमोदक म्हणून सह्या नव्हत्या, तसेच नोटरीही नव्हती.
महायुतीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रमेश कराड, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि शिवसेनेचे आमश्या पाडवी हे आमदार विधानसभेवर निवडून गेले.
त्यांच्याजागी भाजपने आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर संजय केनेकर यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते संजय खोडके आणि शिवसेनेने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली. या पाचही जणांनी काल (17 मार्च) अंतिम दिवशी अर्ज दाखल केला.
महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांच्याकडून एकही उमेदवार देण्यात आला नाही. याशिवाय पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील उमेश म्हात्रे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. आज (18 मार्च) दुपारी 12 वाजता या अर्जाची छाननी पार पडली.
त्यात म्हात्रे यांच्या अर्जावर आवश्यक 10 आमदारांच्या सूचक आणि 10 आमदारांच्या अनुमोदक म्हणून सह्या नव्हत्या. याशिवाय नोटरी नसल्याने अर्ज बाद झाला. त्यामुळे पाच जागांसाठी तीन प्रमुख पक्षांच्या पाच जणांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.
20 मार्चपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरीही तांत्रिकदृष्ट्या 20 मार्च रोजी अधिकृत घोषणा होणार आहे. या घोषणेनंतर विधानपरिषदेत भाजपचे 22, राष्ट्रवादीचे 8 आणि शिवसेनेचे 7 असे महायुतीचे तब्बल 37 आमदारांचे संख्याबळ होणार आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे 7, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आमदार राहणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.