कोल्हापूर परीक्षेत्रातील पोलीस दल अलर्ट मोडवर : अफवा पसरवणाऱ्या विरोधात कडक कारवाई
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती
कोल्हापूर : खरा पंचनामा
नागपूरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाय अर्लट देण्यात आला आहे. कोल्हापूर परीक्षेत्रातील पोलीस दल अलर्ट आहे. परीक्षेत्रात कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना पाचही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना दिली.
कोल्हापूर परीक्षेत्रातील पोलिसांनी काल रात्रभर डोळ्यात तेल घालून कडक बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्र जागून काढली.
नागपूरमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर संपूर्ण राज्यभर अर्लट देण्यात आला आहे.
महानिरीक्षक फुलारी म्हणाले, राज्यात हाय अर्लट देण्यात आला आहे. नागपूरच्या पार्श्वभूमीवर परीक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या भागात पेट्रोलिंग करण्यास सांगण्यात आले होते. संवेदनशील परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाचाही बंदोबस्त संवेदनशील भागात लावण्यात आला आहे. फिक्स पॉईटवर बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पहाटे २ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच थांबून बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले होते. बीट २४ मार्शल हे रात्रभर गस्त घालत होते. त्यानंतर पहाटेपासून गुडमॉर्निंग पथक कार्यन्वित झाले होते. सर्व पोलीस ठाण्यातील सायबर सेलला सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
समाजात तेढ निर्माण करतील अशा बदमाशांना ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज दिवसभर शांतता कमिटीच्या बैठका घेऊन त्यात सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.