राजकीय, सरकारी जाहिरातींत महिलेच्या छायाचित्राचा वापर
महिलेची उच्च न्यायालयात धाव
मुंबई : खरा पंचनामा
राजकीय पक्ष आणि विविध राज्यांनी त्यांच्या योजनांच्या जाहिरातींमध्ये आपल्या छायाचित्राचा बेकायदा वापर केल्याबद्दल त्यांच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी एका महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नम्रता कवळे या याचिकादार आहेत. त्या गावाला गेल्या असताना तेथील फोटोग्राफर तुकाराम निवृत्ती कर्वे यांनी त्यांचे फोटो काढले होते. कर्वे यांनी ते शटरस्टॉक या अमेरिकन वेबसाइटवर अपलोड केले. ही वेबसाइट गरजूंना रॉयल्टी फ्री फोटो स्टॉक पुरविते. खासगी आणि सरकारी संस्थांनी संमतीशिवाय आपल्या फोटोचा गैरवापर केला आहे. त्यामुळे आपल्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यात आले आहे, असे कवळे यांनी म्हटले आहे.
अनेक राजकीय पक्षांनी आणि राज्य सरकारने माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरला. महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा आणि तेलंगणा राज्य सरकार तसेच तेलंगणा काँग्रेस पक्ष, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि टोटल डेंटल केअर प्रा. लि. यांसारख्या खासगी संस्थांनी जाहिराती आणि मोहिमांमध्ये माझे फोटो वापरले. खासगी, सरकारी संस्थांना माझे फोटो कोणत्याही कारणासाठी वापरण्यास मनाई करावी, अशी मागणी कवळे यांनी केली आहे.
'प्रथमदर्शनी, याचिकादाराचे फोटो वापरून व्यावसायिक शोषण केल्याचे दिसते. त्यांना माहिती न देताच त्यांच्या फोटोचा वापर करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक युग आणि सोशल मीडियाचा हा काळ पाहता हा प्रकार फारच गंभीर आहे. त्यामुळे या याचिकेला उत्तर देणे आवश्यक आहे,' असे खंडपीठाने नमूद केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.