अवैध धंद्याला पाठबळ देणारा पीएसआय निलंबित
पुणे : खरा पंचनामा
काळेपडळ पोलीस ठाण्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला अवैध धंद्याला पाठबळ देऊन त्यांच्याकडून हप्ता घेतल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे. शरद निवृत्ती नवले असे या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मंहमदवाडी येथील बीबीसी रुफटॉप किचन अँन्ड येथील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा व काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली होती. येथे १६ टेबलांवर ५७ तरुण-तरुणी हुक्का पित असल्याचे आढळून आले होते.
हुक्का पार्लरवरील ही पुण्यात सर्वात मोठी हुक्का कारवाई होती. या हॉटेलचे मालक पार्थ अनिल वाल्हेकर याने त्याच्याकडील चौकशीत सांगितले की, एप्रिल २०२५ मध्ये हॉटेलमध्ये हुक्का विकण्यास सुरुवात केली. त्याबाबत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शरद नवले याच्याशी बोलणे झाले होते. त्याने हुक्का बार सुरु केल्याबद्दल गुडलकचे ३० हजार व एप्रिल महिन्यांचे ३० हजार रुपये असे ६० हजार रुपये १० एप्रिल २०२५ रोजी रोख स्वीकारले होते. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे हनुमंत गायकवाड पाटील यांनी हॉटेल मालक यांना १२ मे रोजी फोन करुन नवले यांनी ३० हजार रुपये पाठविण्यास सांगितले आहे, असे सांगितले. त्यांच्यामार्फत ऑनलाईन ३० हजार रुपये स्वीकारले. शरद नवले याने हॉटेल मालकाला बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करण्यास प्रोत्साहन देऊन त्याबदल्यात त्याच्याकडून ९० हजार रुपये स्वीकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याने शरद नवले याला पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.