सांगली महापालिकेच्या लिपिकाची संपती 163 टक्क्यानी वाढली
निवृत्त लिपिकासह पत्नीवर गुन्हा : एसीबीचे पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांची माहिती
सांगली : खरा पंचनामा
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेकडील तत्कालीन लिपिकाची संपती 163 टक्क्यानी वाढल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या लिपिकाकडे 35.16 लाखांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या तपासात स्पष्ट झाले असून त्याच्या पत्नीने त्याला अपसंपदा गोळा करण्यास प्रोत्साहन दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. या पती-पत्नी विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसीबीचे सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांनी दिली.
नितीन भीमराव उत्तुंरे (वय 60), वंदना नितीन उत्तुरे (दोघेही रा. सांगलीकर मळा, मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उत्तुरे हे 1990 ते 2019 या काळात सांगली महापालिकेत घरपट्टी विभागात लिपिक पदावर कार्यरत होते. या सेवा काळात त्यांनी भ्रष्ट मार्गाने अपसंपदा जमवल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार उत्तुरे यांनी या काळात ज्ञात मार्गासह अन्य मार्गाने बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट झाले. ही मालमत्ता 35.16 लाख रुपयांची असून ती ज्ञात मार्गाहुन सुमारे 163 टक्क्यानी अधिक आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात हे स्पष्ट झाले असून नितीन उत्तुरे यांना अपसंपदा मिळवण्यासाठी त्यांची पत्नी वंदना यांनी प्रोत्साहन दिल्याचेही उपाधीक्षक कटके यांनी केलेल्या पर्यवेक्षणात स्पष्ट झाले आहे. याबाबत एसीबीचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपाधीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे अधिक तपास केला.
महापालिका वर्तुळात खळबळ
नुकतेच महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर सात लाख रुपये लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच महापालिकेच्या निवृत्त लिपिकाकडे संपती 163 टक्क्यानी वाढल्याचे स्पष्ट झाले असून त्या निवृत्त लिपिकासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.