राज्य उत्पादन शुल्कमधील तब्बल 18 जणांची सांगलीच्या अधिक्षकांकडून चौकशी सुरु
तोतयाची गणवेशात आलिशान कारमधून दारू तस्करी : कोल्हापूरमधील अनेकांचे धाबे दणाणले
सांगली : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गणवेशात अंबर दिव्याच्या आलिशान कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या तोतयासह सैन्य दलातील निवृत्त सैनिकास मार्चमध्येअटक करण्यात आली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याच्या गणवेशात असलेल्या तोतयाच्या कॉल डिटेल्सवरून आता या विभागातील तब्बल 18 जणांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवल्याचे अधीक्षक पोटे यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरु झाल्याने उत्पादन शुल्कमधील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
या दारू तस्करीप्रकरणी नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर) आणि सेवानिवृत्त जवान शिवाजी आनंदा धायगुडे (५७, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी दोघांची नावे आहेत. पथकाने अडीच लाखांची दारू, २५ लाखांची दोन वाहने, मोबाइल असा एकूण २७ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दि. २३ मार्च रोजी पहाटे नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर महागावच्या हद्दीत केली होती.
तोतया कर्मचारी ढेरे हा कोल्हापुरातील विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांकडे खासगी चालक म्हणून दहा वर्षांपासून काम करीत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांकडेही त्याने काम केले आहे. त्याला शासकीय गणवेशाचे बारकावे माहिती होते.
त्याला अटक केल्यावर त्याच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून त्याच्याशी संपर्कात असलेल्या राज्य उत्पादन शुल्कमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कचे सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
याप्रकरणी आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवले असून बाकीच्यांचीही चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर वरिष्ठाना अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे पोटे यांनी सांगितले. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे. या चौकशीतून दारू तस्करीसाठी उत्पादन शुल्कमधील कोणी सहभागी होते का याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.