अहमदाबाद विमान दुर्घटना : 3 महिन्यांपूर्वीच बदललेलं विमानाचं इंजिन
अहमदाबाद : खरा पंचनामा
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेतील विमानाबाबत आता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचं ड्रीमलायनर बोइंग ७८७-८ विमान १२ जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलं.
या दुर्घटनेत २७४ जणांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदातच विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. १२ वर्षे जुन्या असलेल्या या विमानाची अलिकडेच दुरुस्ती करण्यात आली होती.
विमानाचे इंजिन तीन महिन्यांपूर्वी बदलण्यात आलं होतं. मार्च २०२५ मध्ये विमानाच्या एका इंजिनची दुरुस्ती केली होती. अहमदाबादहून लंडनला विमानाने उड्डाण केलं होतं. त्यावेळी टेक ऑफ नंतर काही सेकंदातच विमान कोसळलं होतं. क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी विमानात होते. त्यातला एकच प्रवासी वाचला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानाची जून २०२३ मध्ये मेंटेनन्स तपासणी करण्यात आली होती. तर २०२५ च्या डिसेंबरमध्ये पुन्हा तपासणी केली जाणार होती. एप्रिल महिन्यात एअर इंडियाने ड्रीमलायनरच्या विम्याची रक्कम ७५० कोटींहून ८५० कोटी अशी केली होती. अहमदाबादमध्ये झालेली दुर्घटना ही गेल्या दशकभरातील सर्वात भीषण अशी दुर्घटना आहे. यामुळे एविएशन इन्श्युरन्स क्षेत्राला धक्का बसण्याची शक्यता आहे. दुर्घटनेनंतर एकूण विम्याचा दावा हा ३ हजार कोटींपेक्षा जास्त असू शकतो असा अंदाज आहे.
एअर इंडियाचं विमान जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. दुर्घटनेनंतर ढिगाऱ्यातून मृतदेह जळालेल्या अवस्थेत आणि काही मृतदेहांचे अवशेष सापडले. त्यांची डीएनए चाचणी करून ओळख पटवण्यात आली. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला.
अहमदाबाद दुर्घटनेनंतर डीजीसीएकडून एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर विमानासाठी गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. तसंच अशा विमानांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय केंद्र सरकारकडून दुर्घटनेच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यात त्यांचा अहवाल सादर करणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.