Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील ३० मेडिकल कॉलेजना एनएमसीचा चाप

निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील ३० मेडिकल कॉलेजना एनएमसीचा चाप

मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांच्या वार्षिक नूतनीकरणासाठी तपासणी केली असून त्यात राज्यातील ३० वैद्यकीय महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता केली नसल्याचे आढळले आहे.

यामध्ये नव्याने मान्यता मिळालेल्या १० महाविद्यालयांसह मुंबई महानगरपालिका आणि पुण्यातील सैन्य दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. याबाबत महाविद्यालयांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एनएमसीने थेट वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि डीएमईआरच्या संचालकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

एनएमसीचे पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळ (यूजीएमईबी) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी एमएसएमईआर नियमन २०२३ नुसार वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांचे वार्षिक नूतनीकरण करण्याची प्रक्रिया राबवित येते. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांनी सादर केलेले स्व-घोषणापत्र, आधार सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीमधील प्राध्यापकांच्या उपस्थितीचा डेटा, वैद्यकीय मापदंड आणि पायाभूत सुविधा यांची तपासणी करण्यात आली. या मूल्यांकनानंतर राज्यातील तब्बल ३० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची अपुरी संख्या, वैद्यकीय सोयी-सुविधा आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली.

नोटीसीवर वैद्यकीय महाविद्यालयांनी सादर केलेल्या अहवालाची तपासणी केल्यानंतर उत्तर असमाधानकार असल्याचे आढळून आले. तसेच सातत्याने या त्रुटी अढळत असून, त्या दूर करण्यासाठी संस्थांकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुविधांबाबत मूल्यांकनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्याने अखेर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयागाने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि डीएमईआरच्या संचालकांनाच थेट उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

गतवर्षी मान्यता मिळालेल्या १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई, अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, जालना, बुलढाणा आणि भंडारा या नऊ संस्थांसह सोलापूरमधील डॉ. वैशंपायन मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालय, बारामती, रत्नागिरी, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, सातारा, अलिबाग, जळगाव, मिरज, नंदुरबार, परभणी, सिंधुदुर्ग, नागपूरमधील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळमधील श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील आर्मड् फोर्स वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई महानगरपालिकेचे शीव रुग्णालय यांचा समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.