कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केली पालखी मार्गाची पाहणी
खबरदारी, उपाययोजना, बंदोबस्त याबाबत दिल्या उपाधीक्षकांना सूचना
सोलापूर : खरा पंचनामा
यंदाची आषाढी वारीला अवघ्या काही दिवसांत सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सोमवारपासून पालखी मार्गाचा पाहणी दौरा सुरु केला आहे. पालखी मार्गातील विविध गावांमधील नागरिकांशी त्यांनी संवाद साधत बंदोबस्तावरील पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच पालखी सोहळ्यादरम्यान घ्यावयाची खबरदारी, उपाययोजना, पोलीस बंदोबस्त याबाबत त्यांनी संबंधित पोलीस उपाधीक्षकांना या दौऱ्यात सूचनाही दिल्या.
महानिरीक्षक फुलारी यांनी सोमवारी श्री. संत तुकाराम महाराज पालखी मार्गक्रमण होणारे यवत, वरवंड, उंडवडी, बारामती, सनसर, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलुज, बोरगाव, श्रीपुर, पिराची करोली, वाखरी व पंढरपुर अशा मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी दौंड, बारामती, अकलुज व पंढरपुर येथील उपाधीक्षकांना विविध सूचना केल्या. पालखी मुक्कामाचे ठिकाणी पाणी, विद्युत पुरवठा व शौचालय यांची संबंधीत विभागाकडुन व्यवस्था करुन घ्यावी. पालखी मार्गक्रमण होणारे मार्गावर वाहतुक नियंत्रण, नियमन व वळविण्याबाबत नियोजन करावे. रिंगण सोहळया करीता योग्य बंदोबस्त ठेवुन जमाव नियंत्रण करावे. सोबतच वैद्यकीय पथक रिंगाणाचे आतील बाजुस तैनात करावे. पालखी मुक्कामाचे ठिकाणी भाविकांच्या दर्शन रांगा लावुन वारकऱ्यांना रात्री कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
निरा नदी पात्रामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली पादुका स्नान दरम्यान वारकरी खोल पाण्यात उतरणार नाहीत याची दक्षता घ्यावी, पट्टीचे पोहणारे व बोटी तैनात ठेवावे. पादुका स्नान ठिकाणी प्रखर विद्युत व्यवस्था ठेवावी, पालखी मार्गावर भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करुन हरीतवारी अभियान राबवावे. पालखी मार्गावर रस्ता दुरुस्तीचे कामकाज सुरु असणारे ठिकाणी दुरुस्तीचे काम त्वरीत करणेबाबत संबंधीत विभागास सुचित करावे. आवश्यक ठिकाणी बॅरीकेडींग करावे, अपघात मुक्त वारी राबविण्यातकरीता महामार्ग सुरक्षा पथक व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेशी संमन्वय साधुन वाहतुक वळविण्याचे नियोजन अंमलात आणावे. पालखीच्या मार्गक्रमणास कोणताही अडथळा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. दोन पोलीस घटकांमध्ये पालखीची देवाण घेवाण होत असताना पुढील घटकाने पुर्वीच्या घटकाकडुन हद्दीवर देवाण घेवाण न करता पुर्वीच्या घटकात दोन किलोमीटर आधीच हस्तांतरण असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
वारीसाठी केलेल्या नियोजनाबाबत महानिरीक्षक फुलारी म्हणाले, वारकऱ्यांच्या सुरक्षेकरीता ड्रोनस्चा वापर करुन महामार्गावरील वाहतुकीवर लक्ष ठेवावे. पंढरपुर मंदीर ते महाव्दार घाट या परीसरात उलट दिशेने वारकरी येणार नाहीत याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पंढरपूर वारी दरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे सीसीटीव्ही, ड्रोन व कृत्रित बुध्दीमत्ता तंत्रज्ञान यांचा वापर करण्यात येणार आहे. वारीतील गर्दी हाताळण्याकरीता पोलीस अधिकारी अंमलदार यांचे नाशिक येथील रेजिलेंन्ट इंडिया या संस्थेमार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. नदीमध्ये वारकऱ्यांच्या सुरक्षेकरीता लाईफ बोट, जॅकेट, प्रशिक्षित पोहणारे व्यक्ति, अनाधिकृत बोटींना प्रतिबंध व कारवाई असे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.