Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाना लुटणाऱ्या जयसिंगपूरच्या आंतरराज्य गुन्हेगारास अटक 6.15 लाखांचे दागिने, दुचाकी जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाना लुटणाऱ्या जयसिंगपूरच्या आंतरराज्य गुन्हेगारास अटक 
6.15 लाखांचे दागिने, दुचाकी जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्धाला अडवून पोलीस असल्याची बतावणी करत त्यांच्याकडील दागिने लंपास करणाऱ्या जयसिंगपूर येथील आंतरराज्य गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणत चोरीचे दागिने, दुचाकी असा 6.15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

काशिम सलिम इराणी (वय २७, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, पुणे, सध्या रा. जयसिंगपूर, जि कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 1 जून रोजी तानाजी पाटील आटपाडी ते भिवघाट रस्त्यावरून दुचाकीने निघाले होते. त्यावेळी दोघांनी त्यांना अडवले. त्यांनी 'आम्ही पोलीस आहोत पुढे लुटालुट चालू आहे, तुमच्या जवळील दागिने काढून खिशात ठेवा' असे सांगितले. पाटील दागिने रूमालात बांधत असताना त्यातील एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असे म्हणून हातचलाखीने रूमालामध्ये दागिने न ठेवता दगड ठेवून दिला. काही वेळाने पाटील यांनी रुमाल उघडून पाहिल्यावर त्यात दागिने नसल्याचे दिसून आले. त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. त्यांचा शोध घेत असताना पथकातील हवालदार सागर लवटे यांना हा गुन्हा काशिम इराणी याने केल्याची तसेच तो जयसिंगपूर येथे रहात असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.

पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने ठाणे येथील त्याचा साथीदार अबूजर इराणी याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे दागिने, दुचाकी जप्त करून त्याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. काशिम इराणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर, पुणे, पश्चिम बंगाल येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, संदीप गुरव, सतिश माने, नागेश खरात, अनिल कोळेकर, अमर नरळे, महादेव नागणे, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, संदिप नलावडे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, सुनिल जाधव सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील, अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.