संपत्तीसाठी मुलींनी अपमान केला, फौजी थेट मंदिरात गेला अन् ४ कोटी दान केले
तिरुवन्नमलई : खरा पंचनामा
निवृत्त सैनिकाने आपली ४ कोटी रूपयांची संपत्ती एका मंदिरात दान केल्याची घटना समोर आली आहे. संपत्ती आणि पैशांसाठी बायको आणि मुलींकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत होती, त्यामुळे फौजीने मंदिरालाच सगळी संपत्ती दान केली.
तामिळनाडूतील तिरुवन्नमलई जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ४ कोटींची संपत्ती दान करणाऱ्या फौजीचे नाव एस विजयन् असं आहे. विजयन् यांनी चार कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे मंदिराच्या दानपेटीत टाकली, कुटुंबियांकडून मंदिराकडे ही कागदपत्रे मागण्यात आली. पण मंदिराने ती देण्यास नकार दिला.
तामिळनाडूतील तिरुवन्नमलई जिल्ह्यातील अरुणमिगु रेणुगांबाल अम्मन मंदिरात ६५ वर्षीय निवृत्त सैनिक एस विजयन् यांनी आपली ४ कोटी रुपये किमतीची मालमत्ता दान केली. विजयन् यांनी आपल्या मुलींकडून वारसाहक्कावरून झालेल्या अपमान आणि दुर्लक्षामुळे हा निर्णय घेतला. विजयन् यांनी आपल्या मालमत्तेची कागदपत्रे मंदिराच्या दानपेटीत टाकली. तामिळनाडूमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.
विजयन् यांची पहिल्यापासूनच रेणुगांबाल अम्मन मंदिरात जवळीक होती. ते नेहमी पूजा करण्यासाठी आणि दर्शनासाठी मंदिरात जात होते. पण मागील १० वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. ते पत्नीपासून वेगळे राहत होते आणि त्यांना कुटुंबातील कोणीह पाहत नव्हते. मुलींकडून वारसाहक्कावरून सतत दबाव आणि अपमान सहन करावा लागत होता. त्यामुळे संतापलेल्या विजयन् यांनी संपत्ती दान करण्याचा कठोर निर्णय घेतला. विजयन यांनी मंदिराजवळची तीन कोटींची मालमत्ता आणि दुसरी एक कोटींची मालमत्ता मंदिराला दान केली. त्यामध्ये जमीन आणि घराचा समावेश आहे.
एस विजयन् माझ्या मुलींनी माझा अपमान केला, अगदी माझ्या दैनंदिन गरजांसाठीही मला त्रास दिला. मी माझी मालमत्ता मंदिराच्या नावे कायदेशीररित्या नोंदवणार आहे आणि हा निर्णय मी मागे घेणार नाही.
२४ जून रोजी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी दानपेटी उघडली, त्यावेळी विजयन् यांची कागदपत्रे पुजाऱ्याला मिळाली. त्यासोबत विजयन् यांनी लिहिलेली एक चिठ्ठीही होती. स्वेच्छेने ही मालमत्ता मंदिराला दान करत असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये आहे, असे मंदिराकडून सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.