अधिकारी, अंमलदारांच्या कामाचे बक्षीस, पदकांसाठी प्रस्ताव पाठवा
विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांचे आवाहन
सोलापूर : खरा पंचनामा
प्रत्येक पोलिस अधिकारी व अंमलदाराने कर्तव्य प्रामाणिक व चोखपणे बजावून पोलिस खात्यास शोभनीय काम करावे. त्यांच्या कामाचे बक्षीस, पदकांचे प्रस्ताव सादर करावेत. येथील अधिकाऱ्यांनी अधिकाधिक बक्षिसे व पदके प्राप्त करावीत. जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी हे मंगळवारी (ता. १७) सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर परेडची पाहणी करून सोलापूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांची वार्षिक तपासणी केली.
यावेळी झालेल्या दरबारात उत्कृष्ट कामगिरी करणारे पदक व पुरस्कारप्राप्त अधिकारी व अंमलदारांचा त्यांनी सत्कार केला. सत्कार झालेल्यांमध्ये करमाळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, भरोसा सेलमधील महिला पोलिस कर्मचारी सुरेखा शिंदे, अर्चना शिंदे, श्वान पथकातील टेरी व जिमी श्वानाचे प्रशिक्षक व हॅन्डलर पोलिस अंमलदार सिद्धलिंग स्वामी, चिदानंद रायकोटी, राजू इंगळे यांचा समावेश आहे.
तसेच मागील काही दिवसांमध्ये गुन्ह्यांचा उत्कृष्ट व कुशलतेने तपास करणारे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, नारायण पवार, बालाजी कुकडे, सहायक पोलिस निरीक्षक चौधरी व त्यांच्या पथकातील ३२ अंमलदारांचा देखील त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.