मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
मुंबई : खरा पंचनामा
राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार मुंबईत महापालिका आयुक्त हे प्रभागरचना करणार आहेत. मुंबईत २२७ प्रभाग निश्चित करण्यात आले असून एक प्रभाग पद्धत असणार आहे. लोकसंख्येच्या आधारे ही प्रभाग रचना केली जाणार आहे. यामुळे २७ महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया गतिमान होईल.
अ वर्ग - पुणे, नागपूर, ब वर्ग ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, क वर्ग - नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांतील प्रभागरचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांची असेल. ड वर्ग महानगरपालिकांच्या प्रभागरचनेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. यामध्ये मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल या महानगरपालिकांचा समावेश आहे. या महानगरपालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सर्व प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत.
प्रभाग रचना जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे होईल. सरासरी लोकसंख्या ठरविण्यासाठी एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्यसंख्या गुणिले प्रभागातील सदस्यसंख्या हे सूत्र वापरले जाईल. रस्ते, नद्या, रेल्वे मार्ग यासारख्या नैसर्गिक सीमा विचारात घेतल्या जातील. कोणत्याही इमारतीचे विभाजन दोन प्रभागांत होणार नाही.
नगरपरिषद व नगरपंचायतींचे काय?
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रभागरचनेचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असतील. नगरपरिषदांच्या प्रभागांची संख्या ठरविताना सर्व प्रभाग २ सदस्यांचे करायचे आहेत. सर्वच प्रभाग दोन सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन सदस्यांचा होईल. नगरपंचायतींची प्रभागसंख्या १७ असेल व प्रत्येक सदस्यास एक प्रभाग निश्चित करण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.