Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाईन शॉपमधील दारू सापडूनही दुकानदारांवर कारवाई का नाही?पोलीसांची कारवाई अन राज्य उत्पादन शुल्कची बघ्याची भूमिका

वाईन शॉपमधील दारू सापडूनही दुकानदारांवर कारवाई का नाही?
पोलीसांची कारवाई अन राज्य उत्पादन शुल्कची बघ्याची भूमिका 

सांगली : खरा पंचनामा 

दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या क्राईम ब्रांचने तब्बल साडेअकरा लाखांची दारू बेकायदा वाहतूक करताना पकडली. पोलिसांच्या तपासात ही दारू एका वाईन शॉपमधून खरेदी केल्याचे स्पष्टही झाले. इथल्याच वाईन शॉपमधून लाखो रुपयांच्या दारूची बेकायदा वाहतूक होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही पोलीस, राज्य उत्पादन शुल्कने केलेल्या कारवाईत वाईन शॉपमधील दारू सापडली आहे. असे असतानाही संबंधित दुकानावर ब्रिज (जुजबी कारवाई) केस करून राज्य उत्पादन शुल्कने वेळ मारून नेली. त्यामुळे इतक्या मोठया प्रमाणात दारूची बेकायदा विक्री आणि वाहतूक होत असल्यामुळे या विभागातील कोणाची याला फूस आहे का असाही प्रश्न निर्माण होत आहे.

दारूची खरेदी, विक्री, अवैध दारू निर्मिती, वाहतूक, तस्करी यासह वाईन शॉप, बियर बार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे. अन्य राज्यातील दारूची तस्करी, बनावट तसेच अवैध दारूची निर्मिती आणि विक्री यावर उत्पादन शुल्कने यापूर्वी कारवाई केली आहे. मात्र शहरातील वाईन शॉपमधून लाखो रुपयांची दारू खरेदी करून त्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात हा विभाग कमी पडताना दिसत आहे. पोलिसांना शक्य आहे मग राज्य उत्पादन शुल्कला का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाईन शॉपमधून दारू खरेदी करताना सर्वसामान्य लोकांना नियम आहेत. परवान्याशिवाय कोणालाही दारू विक्री करू नये तसेच परवाना असेल तरी ठराविक युनिटपेक्षा अधिक दारू विक्री करता येत नाही असाही नियम आहे. मग वाईन शॉपमधून लाखो रुपयांची दारू खरेदी करणाऱ्यांना तो नियम लागू होत नाही का असा प्रश्न आहे. त्यामुळे इतक्या मोठया प्रमाणात दारू विक्री करणाऱ्या दुकानदारासह ती खरेदी करून त्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांना याच विभागातील कोणाचे तरी पाठबळ असावे अशी चर्चा आता रंगली आहे.

शिवाय ज्यावेळी एखाद्या वाईन शॉपमधील दारू बाहेर सापडल्यानंतर संबंधित वाईन शॉपवर ब्रिज केस (जुजबी कारवाई) करण्यात आली आहे. आता लाखो रुपयांची दारू सापडल्यानंतर तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित दुकानावर ठोस कारवाई केली जाईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

विशेष म्हणजे याबाबत काही प्रश्न विचारल्यास 'महसूल वाढ' हे गोंडस नाव पुढे केले जाते. आता लाखो रुपयांची दारूची बेकायदा विक्री आणि वाहतूक हेही महसूलच्या नावाखाली दाबले जाण्याची शक्यता अधिक आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.