Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बदल्या, क्रीम पोस्टिंगसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची खासगी व्यक्तींना पत्रे?अति वरिष्ठाच्या बदल्यांचा चेंडू दिल्ली दरबारी : येत्या आठवड्यात तरी बदल्यांना मुहूर्त मिळणार का?

बदल्या, क्रीम पोस्टिंगसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची खासगी व्यक्तींना पत्रे?
अति वरिष्ठाच्या बदल्यांचा चेंडू दिल्ली दरबारी : येत्या आठवड्यात तरी बदल्यांना मुहूर्त मिळणार का?

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ, अति वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या अजूनही रखडल्या आहेत. जून महिना संपत आला तरी या बदल्या झालेल्या नाहीत. काही वरिष्ठ, अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदली आणि क्रीम पोस्टिंगसाठी सरकारवर काही प्रमाणात अंकुश ठेवणाऱ्या संघटनेतील खासगी व्यक्तींनाच पत्रे लिहून साकडे घातल्याची चर्चा आहे. या संघटनेचा तसेच सहयोगी असणाऱ्यांचा बदल्यांमध्ये हस्तक्षेप वाढत असल्यामुळे बदल्यांचा चेंडू आता दिल्ली दरबारी टोलवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे येत्या आठवड्यात तरी बदल्यांना मुहूर्त मिळणार का असा प्रश्न बदलीअधीन अधिकाऱ्यांकडून विचारला जात आहे.

राज्यातील सर्वच शासकीय विभागातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या आणि विनंती बदल्या साधारणपणे मेअखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्या जातात. यंदाही काही बदल्या मे अखेरपर्यंत करण्यात आल्या. मात्र बदल्यांचा मोसम सुरु होताच काहींनी क्रीम पोस्टिंगसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. त्यात सत्तेतील गबर, त्यांचे डावे-उजवे, पीए, मर्जीतले कार्यकर्ते यांच्यासह सरकारशी समन्वय ठेवणाऱ्या संघटनाचे वजनदार व्यक्ती यांचे उंबरे झीजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे या सर्व संबंधितानी आपल्या खास अधिकाऱ्यांसाठी दबाव वाढवला. त्यातच सहयोगी असणाऱ्यांनी त्यांचे गड अभेद्य ठेवण्यासाठी मर्जीतल्या अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी सरकारवर दबाव वाढवला.

या सर्वांची डोकेदुखी वाढल्याने बहुतांशी बदल्यांची यादी तयार असतानाही मातब्बरानी पद्धतशीरपणे बदल्यांच्या विषय थेट दिल्ली दरबारी नेला. तेथे हा विषय गेल्याने दबाव टाकणाऱ्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. दिल्लीत विषय गेल्याने बदल्यांचे घोंगडे भिजत पडले. त्यानंतर मग बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली. तीही संपली मात्र अजूनही अनेक वरिष्ठ, अति वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. 

जून महिना संपत आला तरी बदल्या होत नसल्याने बदलीअधीन अधिकाऱ्यांमध्ये खासगी व्यक्तींना लिहिलेल्या पत्रांची चर्चा होऊ लागली आहे. मात्र या पत्रांमुळे की सहयोगिंच्या हट्टामुळे या बदल्या रखडल्या आहेत हे कळण्यास मार्ग नाही. कोणत्याही कारणामुळे रखडलेल्या बदल्यांना येत्या आठवड्यात तरी मुहूर्त मिळतो का हे लवकरच समजेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.