बदली करण्याआधी पोलिसांची बाजू ऐकली का? : मॅटचा सवाल
मुंबई पोलीस आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
मुंबई : खरा पंचनामा
19 पोलीस निरीक्षकांची बदली करण्याआधी नियमाप्रमाणे त्यांची बाजू ऐकली होती का, असा सवाल करत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) मुंबई पोलीस आयुक्तांना प्रतिज्ञापत्रावर याचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
मॅट सदस्य देबाशीष चक्रवर्ती यांच्यासमोर ही सुनावणी झाली. पोलीस अधिकाऱयांची बदली करण्याआधी चौकशी करावी. संबंधित अधिकाऱयाला बाजू मांडण्याची संधी द्यावी. ही कार्यवाही पूर्ण केल्यावरच बदली आदेश जारी करावेत, असे पोलीस महासंचालकांचे परिपत्रक आहे.
या परिपत्रकाचे पालन करूनच 19 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत की नाही, अशी विचारणा करत मॅटने याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले. यावरील पुढील सुनावणी 17 जून 2025 रोजी होणार आहे.
पोलीस मंडळाने 17 मे 2025 रोजी 19 पोलीस निरीक्षकांचे बदली आदेश जारी केले. याविरोधात समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी अॅड. प्रशांत नागरगोजे यांच्यामार्फत मॅटमध्ये याचिका दाखल केली. अनिल पाटील यांची मरोळ सशस्त्र दलात बदली करण्यात आली आहे. सेवेचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ही बदली करण्यात आली आहे. समतानगर पोलीस ठाण्यातील चांगल्या कामगिरीबद्दल पाटील यांचे कौतुक झाले आहे. त्यामुळे हे बदली आदेश रद्द करावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
मॅटमध्ये याचिका दाखल केल्यानंतर प्रशासनाने पाटील यांना नोटीस जारी करून बाजू मांडण्यास सांगितले होते. अशा प्रकारे अन्य पोलिसांनादेखील नोटीस मिळाल्याचे समजते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.