गाववाल्यावर हात उचलतोस का, आता दाखवतोच तुला !
वाहतूक पोलिसाची कॉलर पकडली
कल्याण : खरा पंचनामा
वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर गोंधळ उडालेला असतानाच कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वाहतूक पोलीस हवालदाराने नियमभंग करणाऱ्या तरुणाला हटकताच, त्या तरुणाने रागाच्या भरात पोलिसाला अश्लील शिवीगाळ केली, कॉलर पकडली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात अर्धा तास गोंधळाचं वातावरण होतं. आता या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ वाहतूक कोंडीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस हवालदाराला एका तरुणाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
शहाड-अहिल्यानगर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली असताना, पोलीस हवालदार सचिन ओंबासे वाहतूक सुरळीत करण्याचं काम करत होते. त्याच वेळी मयूर केणे नावाचा तरुण विरुद्ध दिशेने मोटरसायकल चालवत शहाडकडे जात होता. पोलिसांनी त्याला थांबवत बाजूने जाण्याचा सल्ला दिला. मात्र या छोट्याशा कारणावरून तरुण संतापला. रागाच्या भरात मयूरने पोलीस हवालदार सचिन ओंबासे यांची कॉलर पकडली, त्यांना ढकललं आणि शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. "तू गाववाल्यावर हात उचलतोस, तुला बघून घेतो..." असे म्हणत त्याने अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, मयूरने डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्नही केला.
हा राडा तब्बल अर्धा तास सुरू होता. अखेर आजूबाजूच्या वाहनचालकांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं आणि वातावरण शांत केलं. या घटनेनंतर कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात मयूर केणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.