Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज ठाकरे-फडणवीसांची भेट; 'ताज लँड्स'मध्ये बैठक

राज ठाकरे-फडणवीसांची भेट; 'ताज लँड्स'मध्ये बैठक

मुंबई : खरा पंचनामा

राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होत आहे. मुंबईतल्या हॉटेल ताज लँड्समध्ये उभय नेत्यांची भेट होत आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा सुरु असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मनसेला यश मिळालेलं नाही, तरीहीदेखील राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राज ठाकरे ठरत आहेत. कधी भाजप तर कधी शिवसेनेचे नेते राज ठाकरेंची भेट घेतात. मात्र मागच्या महिन्याभरापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, यावर चर्चा सुरु आहेत. दोन्ही बाजूंचे नेते यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच ठाकरे-फडणवीसांची भेट धक्कादायक आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष्य लागून राहिलं आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची मानली जाते. मुंबई मनपा ठाकरे ब्रँडच्या ताब्यात राहावी, यासाठी उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याचं चित्र राज्यात निर्माण झालं आहे. सुरुवातीला खुद्द राज ठाकरेंनी दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबत पहिलं पाऊल टाकलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही अटी-शर्थीसह एकत्र येण्याबाबत भाष्य केलं होतं.

एकीकडे राज्यामध्ये दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु असताना दुसरीकडे फडणवीस-ठाकरेंच्या भेटीमुळे सर्वांचं लक्ष या भेटीवर केंद्रीत झालं आहे. गुरुवारी मुंबईतल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांची बैठक झाली. भेटीनंतर फडणवीस किंवा ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत की नाही, याबाबत कसलीही माहिती नाही. ही भेट पूर्वनियोजित होती की अचानक? मनसे पुन्हा भाजपला पाठबळ देणार का? याची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.