बनावट विद्यार्थी दाखवून सहा कोटी लाटले; चार महाविद्यालयांच्या प्राचार्यांसह १७ जणांवर गुन्हे
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
शहर परिसरातील चार महाविद्यालयांनी बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवत त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सहा कोटी ५३ लाख १६ हजार ५० रुपये अनुदानावर डल्ला मारला.
यामध्ये चार महाविद्यालयांचे प्राचार्य, आदिवासी प्रकल्पातील लिपिकासह बनावट विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जून २०२२ ते मार्च २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात २९ जुलैला रात्री १७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
फसवणूक करणाऱ्या आरोपींमध्ये सहारा शिक्षण संस्थेअंतर्गत डॉ. एपीजे अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेजचे प्राचार्य सय्यद अरशद अफसर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम आर्टस्, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य खलील पठाण, लिपिक महेश रघुनाथ पाडळे, समीर शामीर पठाण, आदिवासी प्रकल्प कार्यालयातील लिपिक अविनाश मुर्ते, बनावट लाभार्थी व एजंट संदीप रामदास गवळे, परमेश्वर अशोक सोनवणे, राहुल नंदू साळवे, रवींद्र नंदू साळवे, कैलास श्रीपत गवळे, पल्लवी कैलास गवळे, महेश रघुनाथ पाडळे, स्वाती रघुनाथ पाडळे व इतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी गुन्हा दाखल करून घेतला व आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद तपास करीत आहेत.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना दौलत मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२२ ते २०२५ या काळात चारही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे बनावट कागदपत्रे सादर करून पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेत आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार संदीप रामदास गवळे (रा. हळदा, ता. सोयगाव) यांनी प्रकल्प अधिकाऱ्याकडे केली होती. त्यावरून चौकशी समिती स्थापन झाली. चौकशीत ऑनलाइन बोगस विद्यार्थी दाखवून त्यांचे आधार क्रमांक, शैक्षणिक प्रमाणपत्रे सादर करून विद्यार्थ्यांचा आकडा फुगविण्यात आला होता.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेजने तीन वर्षांत ५४९ विद्यार्थी दाखवून दोन कोटी ६९ लाख ६९ हजार ६५०, डॉ. एपीजे अब्दुल कलाम आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेजने ५३४ बोगस विद्यार्थी दाखवून दोन कोटी ५८ लाख ८८ हजार ६५०, चेतना शिक्षण संस्थेच्या कला वरिष्ठ महाविद्यालयाने २८५ बोगस विद्यार्थी दाखवून एक कोटी १७ लाख ३१ हजार ६००, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाने ४८ बोगस विद्यार्थी दाखवून सात लाख २६ हजार १५० रुपयांचा गैरव्यवहार केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.