कामटे खोटे बोलत असल्याचे रेकॉर्डवर आणण्यात सरकार पक्षाचे यश
अनिकेत कोथळे खून प्रकरण : पुढील सुनावणी १९ जुलै रोजी
सांगली : खरा पंचनामा
सांगली येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश सुनील पडवळ यांच्या न्यायालयात कोथळे खून खटल्याची सुनावणी शनिवारी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी यातील संशयित आरोपी युवराज कामटे याचा बचाव पक्षाचा साक्षीदार या नात्याने उलट तपास पुढे सुरु केला. यावेळी सरकारपक्षाच्या उलट तपासादरम्यान युवराज कामटे याने सरकार पक्षाच्या अनेक प्रश्नांना आठवत नसल्याचे तसेच ओळखत नसल्याचा बनाव करीत सरकार पक्षाला उडवाउडवीची उत्तरे दिली. एकूणच सरकार पक्षाच्या आजच्या उलट तपासणी दरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी संशयित आरोपी युवराज कामटे हा खोटे बोलत आहे हे रेकॉर्डवर आणण्यात यश मिळवले. यावेळी निकम यांना जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी मदत केली.
सांगली येथील जिल्हा न्या. पडवळ यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जवळपास सव्वा दोन तास यातील संशयित आरोपी युवराज कामटे याची उलट तपासणी घेतली. यावेळी सरकारी वकील निकम यांनी कामटे याला सांगली शहर पोलीस स्टेशन ते मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन ते घर यातील अंतर किती आहे याबाबत विचारणा केली असता मला माहिती नाही आठवत नाही अशी उडवा उडवीची उत्तरे कामटे याने यावेळी दिली. मात्र यापूर्वी कामटे याने घरापासून ते मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन असे अंदाज अंतर सांगितले होते. याशिवाय जो मोबाईल नंबर कामटे हा दहा वर्षापासून स्वतः वापरत होता तो मोबाईल नंबर विचारला असता मला आठवत नाही असे सरकार पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. सरकारी वकील कुंडलिक चवरे यांना गुन्ह्यानंतर तीन वेळा संशयित कामटे याने फोन केल्याचे व गुन्ह्याची सर्वप्रथम कबुली चवरे यांना कामटे याने दिल्याचेही नाकारत चवरे यांना ओळखत नाही असे कामटे याने सरकार पक्षाच्या प्रश्नांना उडवा उडवीची उत्तरे दिली.
मिरज येथील सद्भावना कार्यशाळेत स्वतः कामटे प्रत्यक्षात हजर असल्याबाबचा कोणताही कागदोपत्री पुरावा कामटे न्यायालयात हजर करू शकला नाही. तसेच सीसीटीव्ही टेक्निशन सुधीर पिसाळ यांच्या कडून डीव्हीआर काढून घेतल्या बाबतच्या प्रश्नांवर पिसाळ यांना ओळखत नसल्याचे कामटे याने सांगितले. एकूणच कामटे खोटे बोलत असल्याचे रेकॉर्डवर आणण्यात सरकार पक्षाला यश आले. तांत्रिक अडचणीमुळे खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात आली. खटल्याचा पुढील उलट तपास व सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे. यावेळी पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी हजर होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.