खेवकलर हा खडसेंचा जावई असल्याची कल्पना नव्हती : पोलिस आयुक्त अमितेशकुमार
पुणे : खरा पंचनामा
खराडी परिसरातील हॉटेलमध्ये गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सिगारेटच्या पाकिटात कोकेनच्या तीन पुड्या लपवून ठेवल्याचे आढळून आले. हे कोकेन नेमके कोणी आणले होते, याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, आरोपींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ड्रगचे सेवन कोणी केले, हे स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेबर्ड अझुर सुटस हॉटेलच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत कथित रेव्ह पार्टी सुरू होती. गुन्हे शाखेने रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला होता. त्यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर तसेच, निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव यांच्यासह दोन तरुणींना अटक करण्यात आली होती.
छाप्यादरम्यान खोलीत टेबलवरील सिगारेटच्या पाकिटात तीन प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये कोकेन सापडले. चौकशीत कोकेन कोणी आणले, याबाबत आरोपींनी अद्याप माहिती दिलेली नाही. तीन दिवसांसाठी हॉटेलमधील खोली बुक करण्यात आली होती.
कारवाईच्या आदल्यादिवशीही या हॉटेलमध्ये पार्टी झाली होती. त्या पार्टीत आणखी कोण होते, याची चौकशी सुरू आहे. खेवलकर हा खडसे यांचा जावई असल्याचे आम्हाला तपासात समजले. तोपर्यंत आम्हाला याबाबत कल्पना नव्हती, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
आरोपींना रविवारी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. प्राथमिक तपासणीत खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे. खेवलकर यांच्या घराच्या झडतीत लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. आरोपी पोपटाणी याच्यावर यापूर्वी सट्टा खेळणे, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, असे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी कारवाईचा आढावा घेतला. त्यांच्यासमवेत पोलिस सह आयुक्त रंजन शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार आणि सुदर्शन गायकवाड उपस्थित होते.
पोलिसांनी सोमवारी दिवसभर आरोपींची कसून चौकशी केली. आरोपींची पोलिस कोठडी मंगळवारी (ता. २९) संपणार आहे. दरम्यान, रोहिणी खडसे आणि आमदार रोहित पवार हे सोमवारी पोलिस आयुक्तांची भेट घेणार होते. परंतु अचानक त्यांनी दौरा रद्द केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.