35 लाखांच्या खंडणीप्रकरणी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
मुंबई : खरा पंचनामा
खंडणीच्या गुन्ह्यात अटकेची कारवाई होताच कूपर रुग्णालयात दाखल झालेले एकनाथ शिंदे यांच्या गटातील माजी नगरसेवक कमलेश केदारनाथ राय याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम कॉन्ट्रक्टर असून तो अंधेरी परिसरात राहतो. त्याचे अंधेरी परिसरात एक बांधकाम प्रोजेक्ट सुरू आहे. 3 जुलैला त्याच्या बांधकाम साईटवर कमलेश राय याने भेट दिली होती. यावेळी कमलेश राय याने बांधकाम कॉन्ट्रक्टरचे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप करून बांधकामावर कारवाई करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बांधकाम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे 35 लाखांची खंडणीची मागणी केली होती. तसेच 3 जुलैला तीन लाख आणि 30 जुलैला पाच लाख रुपयांचे दोन हप्ते घेतले होते.
या घटनेनंतर तक्रारदाराने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर कमलेश राय याला खंडणीचा तिसरा पाच लाख रुपयांचा हप्ता घेताना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्याच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरू होते. आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.