टीव्ही पे ज्यादा बात मत किया कर, नागपूर ज्यादा दूर नहीं वहा आ के तेरा मर्डर..!
मुंबई : खरा पंचनामा
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना टीव्हीवर जास्त बोलू नको, नाही तर तुझा मर्डर करायला वेळ लागणार नाही, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच जिवंत राहायचे असेल तर 50 लाख रुपये तयार ठेव, असे म्हणत खंडणी देखील मागितली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे विविध माध्यमांमधील चर्चासत्रांच्या माध्यमातून पक्षाची बाजू सातत्याने मांडत असतात. ते पक्षाची भूमिका मांडून धर्मांध, विभाजनवादी शक्तींचा विरोध करतात, त्यामुळेच या विभाजनवादी शक्तींकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. त्यांनी या घटनेचा निषेध केला असून या प्रकरणाची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी एक्स या समाज माध्यमाद्वारे केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांनाही ही पोस्ट टॅग केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे हे सातत्याने पक्षाची बाजू विविध माध्यमांतून मांडत असतात. गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता एका हिंदी न्यूज चॅनलवरील चर्चासत्राच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. यावेळी ते त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी होते. टीव्ही चॅनलवरील शो संपल्यानंतर अतुल लोंढे यांना एक फोन आला आणि त्यांना शिवीगाळ सुरु केली. फोनवरील व्यक्तीने लोंढेंना टीव्हीवर जास्त बोलू नको. अन्यथा येथून नागपूर जास्त दूर नाही, तिथे येऊन तुझा मर्डर करू अशी धमकी दिली. अतुल लोंढे यांनी कोणी माथेफिरू असेल असे समजून फोन बंद केला. मात्र त्यांनतर त्याच क्रमांकावरुन त्यांना पुन्हा फोन आला.
अतुल लोंढे यांना दुसऱ्यांदा फोन आल्यानंतर हिंदीतून बोलणारी व्यक्ती म्हणाली की, यानंतर माझा फोन लगेच रिसिव्ह करायचा, नाही तर तिथे येऊन वसुली करेल. तुझा गेम करायला वेळ लागणार नाही. 50 लाख रुपये तयार ठेव, पैसे दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. पैसे कुठे पाठवायचे हे थोड्या वेळाने फोन करुन सांगतो. असे त्यांना फोनवरुन धमकावण्यात आले. यानतंर लोंढे यांनी धमकी देणाऱ्याचा फोन क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर Whatsapp वर त्यांना फोनकरुन धमकावण्यात आले. तिथेही तो फोन क्रमांक ब्लॅकलिस्ट केल्यानंतर मेसेज करुन धमकी देण्यात आली. गुरुवारी रात्री 7 ते 7.55 दरम्यान हे धमकीचे फोन आणि मेसेज येत होते. यानंतर अतुल लोंढे यांनी नागपूर शहर येथील नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.