गुन्ह्याचा तपास न केल्याने दोन पोलिसांवर गुन्हा
सातारा : खरा पंचनामा
कर्तव्य बजावत असताना गुन्ह्यांचा तपास न केल्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, या दोन्ही पोलिसांकडे तब्बल २५ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित होता.
आर. व्ही. पाटील आणि एस. ए. गावित अशी कारवाई केलेल्या पोलिसांची नावे आहेत. यातील एक पोलीस नाईक कर्मचारी २०१५ ते २०१९ दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि सध्या पोलीस मुख्यालय येथे सेवा बजावत आहेत. त्यांनी २ गुन्हे, १ बेपत्ता व्यक्तीचा तपास आणि ७ मृत्यू प्रकरणांचे तपास पूर्ण केले नाहीत.
दुसरे पोलीस कर्मचारी हे २०१८ ते २०१९ या काळात सातारा शहर पोलीस ठाण्यात होते आणि सध्या कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी ६ गुन्हे, ६ बेपत्ता व्यक्तींचा (मिसिंग) तपास आणि ३ मृत्यू प्रकरणांचे तपास पूर्ण केले नाहीत. वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, या दोन्ही पोलिसांकडे तब्बल २५ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित होता. या कारवाईमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.
या दोन्ही पोलिसांना त्यांच्या वरिष्ठांनी अनेक वेळा लेखी आणि तोंडी स्वरूपात हे प्रलंबित तपास पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे असूनही, त्यांनी जाणीवपूर्वक हे गुन्हे प्रलंबित ठेवले. अखेर, बुधवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.