शिक्षण आणि आरोग्य सामान्यांच्या आवाक्याबाहेर...!
इंदूर : खरा पंचनामा
शिक्षण आणि आरोग्य सेवा सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारचे कान टोचले आहेत. या दोन्ही क्षेत्रांचे व्यापारीकरण झाल्याचे नमूद करत त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. रविवारी इंदूर येथील कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले.
ते म्हणाले, "आजच्या ज्ञानाच्या युगात शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी माणूस आपले घर विकू शकतो, पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे, आरोग्यासाठीही माणूस आपली संपूर्ण बचत खर्च करण्यास तयार असतो, जेणेकरून त्याला चांगल्या ठिकाणी उपचार मिळावेत."
ते म्हणाले, "समाजात सर्वाधिक गरज असलेल्या गोष्टी म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. परंतु, आज या दोन्ही सुविधा महाग झाल्या आहेत. त्या सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होत नाहीत. आज शाळा आणि रुग्णालयांची संख्या वाढत आहे; मात्र, या दोन्ही सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत."
"पूर्वी शिक्षण आणि आरोग्य ही क्षेत्रे सेवेचे माध्यम होती. मात्र, आता या दोन्ही क्षेत्रांचे व्यापारीकरण झाले आहे. जेव्हा एखादे क्षेत्र इतका मोठा व्यवसाय बनते, तेव्हा ते आपोआप सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाते," असेही त्यांनी नमूद केले.
मोहन भागवत यांच्या या विधानानंतर आता विविध चर्चाना उधाण आले आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. एकीकडे देशभरात खासगी शाळांच्या वाढत्या फी आणि रुग्णालयांतील उपचारांच्या महागड्या खर्चावर चर्चा सुरू आहे, अशा वेळी मोहन भागवत यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.