Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला; अचानक 'वर्षा'वर पोहोचले अन्...

राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला; अचानक 'वर्षा'वर पोहोचले अन्...

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे परवाच बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल लागलेला असून त्यामध्ये उद्धव ठाकरेंबरोबर युती केलेल्या राज ठाकरे यांचा पराभव झाला असतानाच राज यांनी भेटीचा अचूक टायमिंग साधून नेमका कोणाला इशारा दिला आहे याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. बेस्टच्या निवडणुकीत 'ठाकरे ब्रँड' सपशेल फेल ठरल्यानंतर आता या भेटीच्या माध्यमातून खरोखरच काही वेगळी राजकीय समिकरणं भविष्यात पाहायला मिळणार का? असा सवालही उपस्थित केला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी सकाळी 9 वाजण्याच्या सुमरास 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले आहेत. राज यांनी यापूर्वीही अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. राज यांनी काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील एका आलीशान हॉटेलमध्येही फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये शालेय अभ्यासक्रमामधील मराठी विरुद्ध हिंदी वादावर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. आज राज यांनी नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

मागील काही काळापासून राज ठाकरे आणि भाजपामधील दुरावा वाढला असून दोन्ही ठाकरे बंधूमधील जवळीक वाढल्याचं दिसत आहे. राज ठाकरे 19 वर्षानंतर 5 जून रोजी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसोबत राजकीय मंचावर दिसले. त्यानंतर राज हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. दरम्यानच्या काळात भाजपा आणि मनसे या दोघांकडूनही एकमेकांवर टीका झाल्याचंही पाहायला मिळालं. या कालावधीच झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंसबोत लढूनही पदरी निराशाच पडल्याच्या 48 तासांमध्ये राज फडणवीसांच्या भेटीसाठी गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज आणि फडणवीस यांच्यामध्ये अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या चर्चेचे विषय गुलदस्त्यातच आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.