'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लॉन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा राहुल गांधींकडून जाहीर
दिल्ली : खरा पंचनामा
मतचोरीवरून भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता पूर्ण तयारीनिशी दंड थोपटले आहेत. मतचोरी उघड करण्यासाठी त्यांनी जनमोहीम उघडली असून मिस्ड कॉलसाठी नंबर तसेच तक्रार दाखल करण्यासाठी पोर्टलही लॉन्च करत पुढचं पाऊल टाकलं आहे.
त्यामुळे आयोगाकडून येणाऱ्या इशाऱ्यांसमोर न झुकता त्यांनी आपली लढाई सुरुच ठेवली असून आजही त्यांनी आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत भाजप आणि आयोगाची खरडपट्टी केली.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मतांची चोरी 'एक व्यक्ती, एक मत' या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे.
मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून आमची मागणी स्पष्ट आहे, पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करा, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः तिचे ऑडिट करू शकतील. तुम्हीही आमच्यात सामील व्हा आणि या मागणीला पाठिंबा द्या. https://votechori.in/ecdemand ला भेट द्या किंवा 9650003420 वर मिस्ड कॉल द्या. ही लोकशाहीच्या रक्षणासाठीची लढाई आहे.
नरेंद्र मोदी 25 जागांच्या फरकाने तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. भाजपने 35 हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या 25 जागा अशा आहेत. जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की मोदी चोरी करून पंतप्रधान झाले आहेत, अशा शब्दात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाने गेल्या 10 वर्षांची संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मतदार यादी आणि व्हिडिओग्राफी द्यावी. जर हे सर्व दिले नाही तर तो गुन्हा असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आम्ही भाजपला निवडणूक चोरण्याची परवानगी देत आहोत. संपूर्ण देशाने निवडणूक आयोगाकडे मतदारांचा डेटा मागितला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.