दारुसाठी पैसे न दिल्याने हातकणंगले येथील कचरा वेचकाचा खून
मिरज रेल्वे स्थानकावरील घटना : संशयिताला अटक
मिरज : खरा पंचनामा
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कचरा, प्लास्टिक बाटल्या वेचणाऱ्या हातकणंगले येथील कचरा वेचकाला काठीने डोक्यात बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. मिरज रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
संतोष दुर्गा निंबाळकर (रा. तिवटना, जि. परभणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सतिश बाबुराव मोहिते (वय 40, रा. इचलकरंजी रोड, हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दीपाली सतीश मोहिते यांनी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोमवारी मृत सतिश आणि संशयित संतोष प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यासाठी मिरज रेल्वे स्थानकावर आले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर हेल्थ इन्स्पेक्टर रूमजवळ ते बसले होते. त्यावेळी संतोषने सतीश याच्याकडे दारुसाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यानंतर संतोषने त्याला काठीने तसेच हाताने डोक्यात तसेच शरीरावर बेदम मारहाण केली. त्यात तो जखमी झाल्यावर त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. काळे, उपनिरीक्षक धनंजय चव्हाण यांनी धाव घेऊन संशयित संतोष निंबाळकर याला ताब्यात घेऊन अटक केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.