Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रवासासाठी १२ तास, रस्त्यावर खड्डे, मग टोल का द्यायचा?

प्रवासासाठी १२ तास, रस्त्यावर खड्डे, मग टोल का द्यायचा?

नवी दिल्ली : खरा पंचनामा

केरळमधील एका याचिकेवरून सोमवारी (१८ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाला खडेबोल सुनावले. जर टोल आकारला जाणाऱ्या रस्त्यावरून जाण्यासाठी वाहनचालकांना १२-१२ तास लागत असतील, रस्त्यावर खड्डे असतील, तर मग त्यांनी टोल का द्यायचा? असा प्रश्न न्यायालयाने रस्ते महामार्ग प्राधिकरणाला विचारला. या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील एडापल्ली ते मन्नुथी या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तेथील टोल आकारणी स्थगित केली जावी, असा आदेश केरळमधील उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाविरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यावर सरन्यायाधीश न्या. भूषण गवई, न्या. के. विनोद चंद्रन आणि न्या. एन. व्ही. अंजरिया यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

सरन्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले. सरन्यायाधीश म्हणाले, ज्या रस्त्यावरून जाण्यासाठी सर्वसामान्यपणे एक तास लागतो, तिथून जाण्यासाठी जर वाहनचालकांना १२-१२ तास लागत असतील, तर त्यांनी रुपये १५० इतका टोल का द्यायचा? एक तासाच्या अंतरासाठी ११ तास अधिकचा वेळ द्यायचा आणि वरून तुम्हाला टोलही द्यायचा, असा प्रश्नच त्यांनी याचिकाकर्त्यांना विचारला.

केरळमधील उच्च न्यायालयाने या मार्गावरील टोल स्थगित करण्याचे आदेश देताना संबंधित रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदाराने त्याचे पैसे राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाकडून वसुल करावेत, असेही आदेश दिले आहेत. त्याला महामार्ग प्राधिकरणाने विरोध केला आहे. पण कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यातील वाद हा त्यांनी लवादाच्या माध्यमातून सोडवावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

एडापल्ली ते मन्नुथी रस्त्यावर जिथे खड्डे पडले आहेत, तिथे रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यासाठी सेवा रस्ताही तयार करण्यात आला आहे, याकडे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. पण न्यायलयाने खराब रस्त्यामुळे तिथे १२ तास वाहतूक कोंडी झाली होती, हे तुम्ही बघितले का, असा प्रश्न त्यांना विचारला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तिथे एक ट्रक पलटला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली, असेही न्यायालयाने त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.