हफ्ता न दिल्याने विक्रेत्याला पोलिसांकडून बेदम मारहाण
मुंबई : खरा पंचनामा
दोन पोलिसांनी एका विक्रेत्याला मारहाण केल्याची चित्रफित सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. समता नगर पोलीस ठाण्यातील एक पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचा (एमएसएफ) कर्मचार्याने ही मारहाण केल्याचे चित्रफितीत दिसत आहे.
हफ्ता न दिल्याने ही मारहाण केल्याचा आरोप विक्रेत्याने केला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मालाड पूर्व येथील कुरार परिसरातील गांधी नगरमध्ये ४० वर्षीय व्यक्ती पान, सुपारी विक्रीचे काम करते. त्याची पानाची टपरी आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे समता नगर पोलीस ठाण्यातीन दोन पोलीस कर्मचारी आले. हा विक्रेता गुटख्याची विक्री करीत असल्याचा त्याच्यावर आरोप केला. त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मात्र त्याच्यावर कारवाई न करता त्याच्याकडे पैशांची मागणी केली. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आले.
विक्रेत्याने सदर पोलिसांना ठरल्याप्रमाणे पैसे दिले नव्हते. त्यामुळे संतप्त झालेले दोन्ही पोलीस त्याच्या टपरीवर गेले. या दोघांनी भर रस्त्यात त्याला बेदम मारहाण केली. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. त्यातील काहींनी या मारहाणीची चित्रफित तयार केली. परंतु पोलिसांना त्याची कल्पना नव्हती. हा प्रकार ५ ऑगस्ट रोजी घडला होता. ही चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली आणि हा प्रकार समोर आला. सध्या या विक्रेत्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलिसांनी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचार्याने अशा प्रकारे मारहाण करणे चुकीचे असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित विक्रेत्याकडे बंदी असलेला गुटखा आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित होते. पंरतु त्याच्यावर कारवाई केली नव्हती असे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे पोलीस अधिकार्याने सांगितले. सध्या समता नगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आम्हाला चित्रफितीच्या आधारे या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. त्यानुसार चौकशी करून अहवाल तयार केला जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.