थातूर मातूर कारवायांचे पुरावे द्या कठोर कारवाई करू
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची ग्वाही
सातारा : खरा पंचनामा
सातारा पोलिसांची गुन्हे उकल (डिटेक्शनचे) प्रमाण ८० टक्के इतके आहे. मात्र डिटेक्शन प्रकरणामध्ये मुद्देमालांची शोध व जमा वाढवायला हवी. सातारा जिल्ह्यातील अवैध व्यवसाय विशेषतः मटका कारवायांवर पोलिसांकडून योग्य त्या रकमा न दाखवता थातूरमातूर रकमांच्या कारवाया दाखवल्या जातात, असा प्रश्न उपस्थित केला असता या संदर्भातील आपण मला पुरावे द्या त्यावर मी कठोर कारवाई करतो अशी ग्वाही कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सातारा जिल्ह्यातील पोलिसांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. या आढाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सर्व उपअधीक्षक यावेळी उपस्थित होते.
फुलारी म्हणाले, सातारा पोलिसांनी गणेशोत्सव आणि नवरात्र या काळामध्ये अत्यंत कार्यक्षमतेने कायदा व सुव्यवस्था सांभाळली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ३५ मंडळांवर खटले भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा या संदर्भातील पोलिसांच्या ध्वनिप्रदूषणाच्या कारवाया सुरूच राहणार आहेत.
सातारा जिल्हा पोलिसांनी सीआयआर कार्यक्रमात म्हणजे गहाळ मोबाइल पुनर्प्राप्ती (रिकव्हर) करण्यामध्ये शंभर टक्के कामगिरी नोंदवली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात सातारा जिल्हा पोलीस हे प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सातारा जिल्ह्यातील आठ टोळ्यांवर मोकाअंतर्गत मोठ्या कारवाया करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील दीड वर्षांपासून तांत्रिक कारणास्तव रखडलेल्या सातारा पोलिसांच्या नवीन गृहनिर्माण संकुलामधील सदनिकांचे येत्या दिवाळीत वितरण केले जाणार आहे. ६९३ सदनिकांची सोडत काढली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. दरम्यान सातारा शहरातील वाढत्या अवैध व्यवसायासंदर्भात कठोर कारवाया सुरूच आहेत, आपणास असे काही आढळल्यास आपण माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.