Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हरिपुरातील महिलेला चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटकदागिने, बुलेटसह ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त ः सांगली ग्रामीण पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई

हरिपुरातील महिलेला चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक
दागिने, बुलेटसह ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त ः सांगली ग्रामीण पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई

सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील हरिपूर येथील निळकंठनगर येथे घरी एकट्याच असणाऱ्या वृद्धेच्या घरात घुसून चाकूच्या धाकाने दागिने लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बुलेट, चोरीचे सोन्याचे दागिने असा ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किरण चौगले यांनी दिली.

पार्श्व अनिल माणगावकर (वय १९, रा. खंडेराजुरी, ता. मिरज), ऋशिकेश मोहन पाटणे (वय २२, रा. हरिपूर, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुवारी दुपारी वनिता रहाटे या निळकंठनगर येथील घरात एकट्याच होत्या. त्यावेळी दोघेही संशयित त्यांच्या घरात घुसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत रहाटे यांच्याकडील १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याबाबत रहाटे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. निरीक्षक चौगले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

निरीक्षक चौगले यांना ही चोरी माणगावकर आणि पाटणे यांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट, चाकू, १३.७६० ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, २.२५० ग्रॅम वजनाची कर्णफुले असा ३.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, मेघराज रूपनर, रामदास बागडी, अभिजित पाटील, बंडू पवार, रमेश पाटील, सचिन कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.