"महाराष्ट्र जळत असताना फडणवीस बासरी वाजवतायत"
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी विरोधकांकडून होताना दिसत आहे. तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे, जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.
याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार यांनी मालबार हीव मुंबई येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी केलेल्या कामाची ई-निविदा पोस्ट केली आहे. ज्यामध्ये वर्षा या निवासस्थानी केलेल्या खर्चाचा तपशील देण्यात आलेला आहे.
त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना सरकारकडे पैसे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफी दिली जात नाही. तर दुसरीकडे राज्यावरील कर्जाचा बोझा 9.5 लाख कोटींच्या वर गेला आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी डबल बेड मैट्रेस, सोफा यासाठी 20.47 लाख रुपये, तर किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाख असा एकूण 40 लाखांहून अधिक पैसा खर्च केला जात आहे. यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर 'रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे' असाच त्याचा अर्थ निघेल. मान्य आहे की, मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत, पण केव्हा? आणि त्यासाठी किती खर्च करावा? याचाही ताळमेळ असला पाहिजे ना, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या आरोपानंतर आता देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते, हे पाहावे लागेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.