"डॉ. बाळासाहेब चोपडे यांचा तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीतर्फे सत्कार"
सांगली : खरा पंचनामा
सांगलीचे प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. बाळासाहेब शामराव चोपडे यांचा त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल विशेष सन्मान प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता. या सन्मानाच्या प्रित्यर्थ तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीतर्फे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सन १९९५ पासून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत डॉ. चोपडे यांनी गेली ३० वर्षे सातत्याने सेवा देत आतापर्यंत तब्बल १.५ लाखांहून अधिक बिनटाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना सुरक्षित व निस्वार्थ आरोग्यसेवा पुरविण्याचे त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी डॉ. चोपडे यांच्या तीन दशकांच्या वैद्यकीय सेवेचा आढावा घेत समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. "आरोग्यसेवा ही व्यवसायापलीकडे जाऊन खरी समाजसेवा ठरते, हे डॉ. चोपडे यांच्या कार्यातून सिद्ध होते," असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. चोपडे म्हणाले, "समाजसेवा हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. रुग्णांच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच माझी खरी संपत्ती आहे. आगामी काळातही मी अशाच पद्धतीने समाजोपयोगी कार्यात सक्रिय राहीन," असे त्यांनी नमूद केले.
हा सत्कार सोहळा तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉ. डी. डी. चौगुले यांच्याहस्ते झाला. याप्रसंगी संस्थेचे संचालक मिलिंद भिलवडे, महावीर चौगुले, अजित फराटे तसेच प्राचार्य डॉ. किरण वाडकर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
