Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस महासंचालकांसह 13 पोलिसांविरोधात गुन्हा दाखलIAS पत्नीच्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागं !

पोलीस महासंचालकांसह 13 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल
IAS पत्नीच्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागं !

चंदीगड : खरा पंचनामा

हरयाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय. एस. पूरन यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाय. एस. पूरन यांची आयएएस पत्नी अमनीत कुमार यांच्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि पोलीस महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर, रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारनिया यांच्यासह 13 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूरन यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ज्या-ज्या अधिकाऱ्यांची नावे होती आणि त्यांच्या पत्नीने ज्यांच्यावर पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले असा आरोप केला त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे.

हरयाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय. एस. पूरन यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता त्यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार यांनी पोलीस महासंचालक आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर आणि रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारनिया यांनी पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला असून त्यांच्याविरोधात भादवि कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय. एस. पूरन यांच्या पत्नी अमनीत कुमार आयएएस अधिकारी असून हरयाणा सरकारच्या परराष्ट्र सहकार्य विभागाच्या आयुक्त आणि सचिव आहेत. ही घटना घडली तेव्हा त्या मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा भाग म्हणून जपानमध्ये होत्या. बुधवारी त्या मायदेशी परतल्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पतीच्या मृत्यूस जबाबदार धरले आहेत. एवढेच नाही तर त्यांनी पतीचे शवविच्छेदनही थांबवले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

पतीला सतत जातीय भेदभाव, मानसिक छळ आणि प्रशासकीय कामात पक्षपात सहन करावा लागत होता, असा आरोप अमनीत कुमार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी 2020 पासून मुख्य सचिव, सहायक पोलीस आयुक्त, हरयाणाचे डीजीपी, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रारी केल्या. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा अमनीत कुमार यांनी केला.

दरम्यान, मंगळवारी चंदीगडच्या सेक्टर 11 येथील आपल्या राहत्या घरी वाय. एस. पूरन यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आठ पानांची सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. यात त्यांनी 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि काही निवृत्त अधिकाऱ्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.