दोन पोलीस, 4 वेळा अत्याचार अन्.. हातावर सुसाईड नोट लिहून महिला डॉक्टरची आत्महत्या
फलटण : खरा पंचनामा
साताऱ्यातील फलटण शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
संपदाने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या केवळ फलटण उपजिल्हा रुग्णालयच नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. आता याप्रकरणी संपदाची सुसाईड नोट समोर आली आहे. यात तिने दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूला PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपदा मुंडेने तिच्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली आहे. यात तिने दोन पोलीस कर्मचारी आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आणि त्यांनी शारीरिक, मानसिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
डॉ. संपदा मुंडे यांनी आपल्या 'सुसाईड नोट' मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे कीः "माझ्या मरणास पोलीस निरिक्षक गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केले. तसेच, पोलीस प्रशांत बनकर यानेही मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला."
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्या चर्चेत होत्या आणि या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशीदेखील सुरू होती. या तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी संपदा मुंडेने पोलीस अधिकाऱ्यावर थेट अत्याचार आणि छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे साताऱ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.