सत्ताधारी आमदारांची दिवाळी दणक्यात!
54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा विकासनिधी
मुंबई : खरा पंचनामा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती सरकारकडून विकास निधीचा मोठा वर्षाव करण्यात आला आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये अशा एकूण 270 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढला आहे.
महायुतीने ग्रामविकास आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांत जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला आहे. त्यानंतर आता सरकारने आपला मोर्चा थेट आमदारांकडे वळवला आहे.
राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आमदारांकडून वाढीव निधीची मागणी केली जात होती. सुरुवातीस प्रत्येक आमदाराला 10 कोटी रुपयांचा विकासनिधी देण्याचा विचार होता, मात्र 'लाडकी बहीण' योजनेमुळे आलेल्या आर्थिक ताणामुळे अखेर निधीची रक्कम कमी करून प्रत्येकी 5 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांतील विकासकामांना गती मिळणार असली, तरी विरोधकांनी मात्र निवडणुकीपूर्वीचा हा निधीवाटपाचा निर्णय निव्वळ राजकीय स्वार्थासाठी असल्याचा आरोप करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.