मिरज घटनेतील ३५ जणांची नावे निष्पन्न
१३ जण ताब्यात; जमावबंदी उल्लंघनाचा गुन्हा : पोलीस अधीक्षक संदीप घुगे
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
मिरजेत काल रात्री दोन गटात झालेल्या वादानंतर घडलेल्या घटनेतील दोन्ही गटाच्या ३५ जणांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. त्यापैकी १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही गटातील संशयितांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, मिरजेत दोन वेगवेगळ्या जातीच्या मित्रांमध्ये मंगळवारी रात्री वाद झाला होता. त्यावेळी धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून दोन गट समोरासमोर आले. पोलिस ठाण्यासमोर बेकायदा जमाव जमला होता. याप्रकरणात पोलिसांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई केली आहे. तसेच बेकायदा जमाव जमवून जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३५ संशयितांची ओळख पटली असून १३ जणांना ताब्यात घेतले आहे.
मिरजेतील वादानंतर सर्वत्र वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. यासाठी सायबर सेल ॲक्टीव करण्यात आला आहे. अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या पार्श्वभूमीवर मिरजेतील आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह प्रशासन अधिकारी, शांतता कमिटी, प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक यांची बैठक घेतली. या बैठकीत शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केल्याचे अधीक्षक घुगे यांनी सांगितले.
मिरजेत दोन गटात झालेल्या वादानंतर अनेकांना नेमकी घटना माहीत नव्हती. अर्धवट माहितीच्या आधारे अनेकजण एकत्र आले होते. त्यांनी बेकायदा जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. वादावादीनंतर गाड्यांची तोडफोड झाल्याची कोणतीही माहिती पोलिसांपर्यंत आली नाही. एका फलकाचा चोळामोळा करण्यात आला. कोणत्याही फलकावर धार्मिक नोंद नव्हती. त्यामुळे या प्रकरणावरून कोणीही अफवा पसरू नये. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता कमिटीसह सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन घुगे यांनी यावेळी केले.
यावेळी अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपाधीक्षक विमला एम., उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.