Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुणवत्तेची कास धरा, मराठी विद्यापीठाला संपूर्ण सहकार्य करू : उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

गुणवत्तेची कास धरा, मराठी विद्यापीठाला संपूर्ण सहकार्य करू : उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

अमरावती : खरा पंचनामा

सुमारे अडीच हजार वर्षांचा इतिहास मराठी भाषेला लाभला आहे. त्यामुळे मराठीत संशोधन होणे आवश्यक आहे. मराठीच्या विकासासाठी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाने गुणवत्तेची कास धरावी. यासाठी विद्यापीठाला आवश्यक संपूर्ण सहकार्य देऊ, अशी ग्वाही उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या 11 भाषांच्या प्रतिनिधींच्या परिषदेला सुरूवात झाली. यावेळी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बाराहाते, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ. मनिष जोशी, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुळकर्णी, मराठी भाषा विभागाचे सहसचिव अभय खांबोरकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, जगामध्ये आज संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे. संशोधनातून पेटंट आणि त्यातून रॉयल्टी मिळविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे आपणही यात मागे राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या कालावधीत केलेल्या प्रयत्नांमुळे जागतिक स्टार्टअपमध्ये भारताने अग्रस्थान पटकाविले आहे. जागतिक महासत्ता होण्यासाठी शिक्षण आणि संशोधनावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक विषय आत्मसात करण्यासाठी या अभ्यासक्रमाचे शिक्षण मराठीतून देण्यात येत आहे. गेल्या सत्रात 67 टक्के तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी मराठीतून परीक्षा दिली आहे. मातृभाषेत शिक्षण मिळाल्याने विषय कळण्यास मदत होत असल्यामुळे एका वर्षात तंत्रनिकेतनमधील प्रवेशाची संख्या दुप्पट झाली आहे.

मराठी विद्यापीठाचा विषय शासनाने गंभीरपणे घेतला आहे. आवश्यक तेवढ्या जागा भरण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच विद्यापीठाच्या बांधकामासाठी सर्व परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने आता अत्युच्च दर्जाची शिक्षण देणारी व्यवस्था उभारावी. अभ्यासक्रम शिकविणारे तज्ज्ञ आणि सुसज्ज ग्रंथालय उभारावे. तसेच स्वातंत्र्यानंतर नोंदी ठेवणे कमी झाल्याने स्पष्ट, मुद्देसूद नोंदीसाठी पुढाकार घ्यावा. नोंदीबाबत परिषदेमध्ये मंथन व्हावे. मराठीच्या भविष्यातील वाटचालीत ही परिषद महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे ही परिषद ऐतिहासिक ठरणार असल्याचे  पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीत चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला.  अभिजात भाषा परिषदेत देशभरातील 11 भाषांचे प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. त्यांना त्यांच्या भाषेत कळावे, यासाठी भाषिनीचा उपयोग करण्यात येत आहे. एकाचवेळी 11 भाषांमध्ये वक्त्यांच्या भाषणानुसार तात्काळ भाषांतर करण्यात येत आहे. 11 प्रकारचे भाषांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाषिनी हे भारतीय भाषांचे भाषांतर करणारी यंत्रणा आहे. यामुळे वक्ता त्यांच्या मातृभाषेतून सादरीकरण करीत असताना श्रोत्यांना समोरील स्क्रीनवर त्यांच्या भाषेतील भाषांतर वाचण्याची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे उपस्थित सर्वांना वक्त्याचा विषय कळण्यास मदत झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.