प्रकाश लोंढे टोळीवर मोका अंतर्गत कारवाई
नाशिक : खरा पंचनामा
सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळील 'ऑरा' बारमध्ये झालेल्या 'प्रोटेक्शन मनी'साठीच्या गोळीबार, खंडणी व दहशत निर्माण प्रकरणात कुख्यात गुंड प्रकाश लोंढे उर्फ 'बॉस' आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. 27) सायंकाळी लोंढे टोळीतील सतरा सदस्यांवर मकोका लागू करण्याच्या प्रस्तावावर त्यांनी स्वाक्षरी केली. या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत लोंढे टोळीची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
'ऑरा बार'मधील राड्यानंतर झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित भूषण प्रकाश लोंढे हा अजूनही फरार आहे. तर या प्रकरणात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, तसेच शुभम उर्फ भुऱ्या पाटील, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत अडांगळे, दीपक उर्फ नानाजी लोंढे, संतोष शेट्टी उर्फ जल्लाद, अमोल पगारे, देवेश शेरताळे, शुभम गोसावी, सनी उर्फ ललीत विठ्ठलकर, भूषण उर्फ भाईजी लोंढे, प्रिन्स सिंग, शुभम निकम, वेदांत चाळगे, राहुल गायकवाड, निखील निकुंभ आणि संदीप गांगुर्डे या एकूण 17 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
या संशयितांविरुद्ध गोळीबार, खंडणी, हप्ता वसुली, मालमत्ता कब्जा, फसवणूक आणि दहशतीचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये या टोळीविरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याने, संघटित गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस आयुक्तालयाने मोक्का अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या पथकाने याआधी लोंढेच्या संपर्क कार्यालय 'धम्मतीर्थ' येथे धाड टाकली होती. तेव्हा तेथून कुऱ्हाड, चाकू, इतर प्राणघातक शस्त्रे तसेच महागड्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. 'बेडरुम'मध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडल्या तर सीसीटीव्ही डीव्हीआरही जप्त करण्यात आला होता. नंतर महापालिकेने त्या कार्यालयावरील अतिक्रमण जमीनदोस्त केले. आता लोंढे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याने लोंढे पिता-पुत्राच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.