खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; चार महिला गंभीर जखमी
बीड : खरा पंचनामा
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.
ही धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये घडली. मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. टोळक्याच्या हातात दांडगे, कोयते, कुऱ्हाडी होत्या आणि त्यांनी कुटुंबातील महिलांवर अमानुष हल्ला चढवला.
महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, मदतीसाठी किंकाळ्या फोडल्या, पण टोळक्याला कोणताही पाझर फुटला नाही. थेट डोक्यावर, पाठीत आणि पायांवर वार करण्यात आले. या मारहाणीत सर्व महिला रक्तबंबाळ झाल्या. जखमी महिलांनी कसाबसा पोलीस ठाण्याचा रस्ता धरला आणि शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जखमींना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता? असे म्हणत टोळक्याने सतीश भोसलेच्या कुटुंबाला जबर मारहाण केल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.