'रांगोळी' प्रकरणावरून गोपनीय विभाग 'रडार'वर
चौकशी सुरू, कठोर कारवाई करणार : महानिरीक्षक कराळे
अहिल्यानगर : खरा पंचनामा
अहिल्यानगरमधील रांगोळीप्रकरणानंतर उसळलेल्या हिंसाचारावर, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी अहिल्यानगर पोलिसांच्या कामगिरीवर अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली. अहिल्यानगर पोलिस दलासह कोतवाली पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित करत चौकशी सुरू असल्याचे सांगितले. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत, पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगरमधील हिंसाचाराचा विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आढावा घेतला. अहिल्यानगर शहरातील अलीकडच्या काळत धार्मिक आणि जाती-पातीच्या मुद्यावरून तणाव वाढत आहे.
यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये अहिल्यानगर पोलिस दल नेहमीच 'अॅक्शन मोड' मध्ये असले पाहिजे, अशी अपेक्षा दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केली.
अहिल्यानगरमधील हिंसाचारवरून त्यांनी पोलिस दलाच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "रांगोळी काढून परधर्मियांच्या भावना दुखविण्याचा रासकर दांपत्याचा काय उद्देश होता? त्यांना यासाठी कोणी प्रवृत्त केले होते? याचा शोध पोलिस घेत आहेत." तसंच रांगोळीविषयी बंदोबस्तावरील पोलिसांना याची माहिती असेल व त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले का? पोलिस दोषी असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल.
कार्यक्रम आणि तिथं होणाऱ्या घटनेची माहिती पोलिसांच्या गोपनीय विभागाला असणे आवश्यक आहे. गोपनीय विभागाला याविषयी काही कल्पना होती का? असेल, तर त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळविले होते का? याची चौकशी केली जाईल, असे दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.
धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर काढण्यात आलेल्या रांगोळीप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर (रा. बारातोंटी कारंजा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संग्राम रासकर याला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली जात असल्याचे दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.