बिहारच्या मतदार यादीतील वगळलेल्या ३.६६ लाख मतदारांची माहिती सादर करा
नवी दिल्ली : खरा पंचनामा
बिहारच्या सखोल मतदार यादी पडताळणीवेळी (एसआयआर) ज्या ३.६६ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, त्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारपर्यंत आयोगाला ही माहिती सादर करावी लागणार आहे. विशेष म्हणजे अलीकडेच आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या होत्या.
अंतिम मतदार यादीत जी नावे जोडली गेली, त्यातील बहुतांश नावे जुन्या मतदारांची असल्याचे आयोगाकडून सुनावणीवेळी सांगण्यात आले. वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी कोणाही मतदाराकडून तक्रार अथवा अपील करण्यात आलेले नाही. शिवाय याबाबत न्यायालयात याचिका दाखल झालेली नाही, अशी माहिती आयोगाने न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठाला दिली.
अभिषेक मनू सिंघवी आणि प्रशांत भूषण या वकिलांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. प्रत्येक राजकीय पक्षाला मतदार याद्यांची सूची देण्यात आली आहे. तथापि कोणतीही व्यक्ती आयोगाकडे तक्रार घेऊन आलेली नाही.
दिल्लीत बसलेल्या काही गैरसरकारी संस्था आरडाओरड करत असल्याचे आयोगातर्फे अॅड. राकेश द्विवेदी यांनी सांगितले. यावर ज्या लोकांची नावे वगळली गेली आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात आली नाही तसेच इतरांच्या सांगण्यावरून ही नावे वगळण्यात आल्याचा आक्षेप सिंघवी यांनी घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.