Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गृहराज्यमंत्री येणार अडचणीत?गुंड निलेश घायवळच्या सख्ख्या भावाला मिळालं बंदुकीचं लायसन्स !

गृहराज्यमंत्री येणार अडचणीत?
गुंड निलेश घायवळच्या सख्ख्या भावाला मिळालं बंदुकीचं लायसन्स !

पुणे : खरा पंचनामा

पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर खंडणी, गोळीबार, मकोका अंतर्गत कारवाई आणि परदेशात पलायनाच्या आरोपांचं वादळ अजून शमलेलं नसताना, गृहमंत्रालयानं त्याच्या भावाला शस्त्र परवाना मंजूर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याला मंजुरी दिल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली आहे. पण या प्रकारावर गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना नियमानुसारच हा परवाना दिल्याचं म्हटलं आहे.

या घटनेमुळं राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. निलेश घायवळच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळं त्याच्या कुटुंबीयांना शस्त्रपरवाना मिळतोच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

निलेश घायवळ पुणे शहरातील गुन्हेगारी जगतातील एक प्रमुख नाव आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्रसाठा, हाणामारी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. कोथरुड येथील अलिकडे झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली होती. या गुन्ह्यानंतर घायवळनं पोलिसांना चकवा देऊन स्वित्झर्लंडला पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी त्यानं पासपोर्ट मिळवण्यासाठी आडनावात छोटासा बदल करुन त्याद्वारे पळवाट काढून पळून गेला. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले असून, विशेष पथक त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

या पार्श्वभूमीवर, गृहमंत्रालयाकडून निलेश घायवळच्या भावाला शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत हा परवाना मिळवणं ही एक संवेदनशील प्रक्रिया आहे, ज्यात अर्जदाराच्या पार्श्वभूमीची कसून तपासणी केली जाते. मात्र, निलेशसारख्या कुख्यात गुंडाच्या भावाला परवानगी देण्यात आल्यानं प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा परवाना नुकताच मंजूर झाला असून, त्याची अंतिम अधिसूचना गृहमंत्रालयानं जारी केली आहे. मात्र हा परवाना देण्यास पुणे पोलिसांनी विरोध केला होता. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ यावरती देखील खुनाचा प्रयत्न आणि अवैध शस्त्र बाळगण्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता. याबाबत सचिन घायवळ यानं गृह खात्याकडं अपील केलं होतं आणि त्यानंतर त्याला हा परवाना देण्यात आला आहे. हा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला असल्याचं समोर आला आहे.

निलेश घायवळ प्रकरण राजकीय पातळीवर हे प्रकरण चांगलच तापलं आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्र्यांवर घायवळला राजकीय संरक्षण मिळाल्याचे आरोप केले आहेत. यापूर्वी घायवळचा भाजप आमदार राम शिंदे यांच्याबरोबर देवदर्शनासाठी असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामुळं महाविकास आघाडीनं प्रशासनावर हल्लाबोल केला होता. आता शस्त्रपरवाना प्रकरणानं विरोधकांनी गृहमंत्रालयाच्या निर्णयावरून घेरण्यास सुरुवात केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.