शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की
बापू पठारे-बंडू खांदवेंमध्ये राडा !
पुणे : खरा पंचनामा
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांना लोहगाव परिसरात झालेल्या कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की झाली. ही धक्काबुक्की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर झाल्याची माहिती आहे.
लोहगाव येथे शनिवारी संध्याकाळी एका स्थानिक कार्यक्रमादरम्यान आमदार पठारे आणि बंडू खांदवे शाब्दिक वाद झाला. वाद चिघळताच दोन्ही बाजूंमध्ये मारामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हा सर्व वाद रस्त्याच्या कामाच्या वरून झाला असल्याचे सांगितले जात आहे.
प्रशासनाकडून लोहगाव परिसरातील रस्त्याचे काम काही कारणास्तव थांबवण्यात आले होते. या विरोधात खांदवे आंदोलन करणार होते आणि यावरूनच हा वाद झाल्याचा सांगितलं जात आहे.
लोहगाव वाघोली रोडवरील गाथा लॉन्स येथे एका माजी सैनिकांच्या सत्काराचा नियोजित कार्यक्रम होता त्यासाठी बापूसाहेब पठारे तिथे कार्यक्रमाला येत होते. त्याच कार्यक्रमातून लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सभापती बंडू खांदवे बाहेर येत असताना आमदार पठारे यांची एन्ट्री झाली. तेथे दोघांमध्ये शाब्दिक वाद पेटला त्यानंतर झटापट झाली. आमदार पठारे यांना धक्काबुक्की करण्यात आली. पठारेंच्या समर्थकांना ही माहिती कळताच त्यांचे समर्थक तसेच खांदवेंचे समर्थक देखील तेथे आले. त्यामुळे परिसरात तणाव वाढला होता.
वातावरण चिघळू नये म्हणून उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना परिस्थिती हाताळण्यासाठी फोनवरून आदेश दिले. काहीच वेळात गाथा लॉन्सला छावणीचे स्वरूप आले. रात्री उशीरापर्यंत विमानतळ पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
08 डिसेंबर 2023 रोजी रोडला 31 कोटी रुपये मंजूर झाले होते तर 2024 पर्यंत कोणी अडवले होते. जर आपल्याला रोड करण्यासाठी ज्ञान प्राप्त असतं तर आपण समजून घेतले असते परंतु राजकारण म्हणून आंदोलन करणं हे तुम्हाला शोभत का? त्या रस्त्यावर पाण्याच्या लाईन नव्हत्या, ड्रेनेजच्या लाईन नव्हत्या. नागरिकांनी त्या जोडल्या नव्हत्या तर रस्ते करायचे कसे होते मग राजकारण म्हणून जन आक्रोश आंदोलन करायचे का? मग 5 वर्षांमध्ये सत्तेमध्ये होते तेव्हा आर पी रस्ते, डीपी रस्ते का केले नाही कुणी अडवले होते. आपण मग आता चुकीची यादी दाखवून लोकांना फसवण्याचे काम करता का? असा माझा सवाल आहे. समोर येऊन बोला माझ्याबरोबर खोटं राजकारण करू नका. जनता माफ करणार नाही, असे आमदार बापू पठारे म्हणाले.
बंडू शहाजी खांदवे म्हणाले, आमचे आंदोलन हे प्रशासनाविरूद्ध होते परंतू आमदारांनी हा विषय स्वतःवर ओढावून शाब्दिक वाद घातला. वेळ पडली तर आम्ही गाव विकत घेऊ अशी धमकी दिली. झटापटीमध्ये आमदारांच्या तीन ते चार सुरक्षारक्षकांनी माझे शर्ट फाडले आणि मलाही मारहाण केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.