"तुम्ही मालक नाहीय, साखर कारखान्याचा मालक शेतकरी आहे"
अहिल्यानगर : खरा पंचनामा
लोणी इथं सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रवरा उद्योग समुहाच्यावतीने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवरा उद्योग समुहाचे यासाठी आभार मानले. तसंच भाषणातून साखर कारखान्यांकडून प्रति टन ५ रुपये शेतकऱ्यांच्या मदतीच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांवर घणाघात केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यावर संकट आलं तर प्रवरा उद्योग समुहाने एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले. पण काही लोक छोट्या मनाचे झालेत. आमची उच्च स्तरीय समितीची बैठक झाली. साखर कारखान्यांचे ३० हजार कोटींचे व्यवहार होतायत. १० हजार कोटी सरकार देतंय. तर तुमच्या नफ्यातून ५ रुपये हे शेतकऱ्यांसाठी बाजूला काढून ठेवा सांगितलं.
आम्ही एफआरपीतले पैसे मागितले नव्हते. एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांचे आहेत. नफ्यातले पैसे कारखान्यांचे आहेत. आपण विचार केला तर या ठिकाणी २०० कारखाने आहेत. फार तर २५ लाख एका कारखान्याला शेतकऱ्यांसाठी बाजूला काढून द्यायला सांगितलं तेव्हा काही लोकांनी अशा गोंधळ घातला की शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करताय. पण आम्ही शेतकऱ्यांकडून नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातून २५ लाख रुपये घेतोय असं स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं.
जो शेतकरी तुमच्याकडे राब राब राबतोय, शेतमाल टाकतो, हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करतो. त्या शेतकऱ्यावर देखील मागे पुढे पाहता. आता असे काही कारखाने आहेत जिथे शेतकऱ्याचा काटा मारला जातो. आता त्यांना मी दाखवणार आहे, तुम्ही शेतकऱ्यांचा काटा मारून पैसे जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी २५ लाख रुपये देण्याची दानत नाहीय. तुम्ही मालक नाहीय, याचा मालक शेतकरी आहे. या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहण्याचं काम सरकार करेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यावर आपत्ती आलीय. अहिल्यानगरमध्येही कधी पाहिला नाही असा पाऊस आला. या आपत्तीचंही काही लोक राजकारण करतायत. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहे. आम्ही सगळे बसून शेतकऱ्यांना जास्तीजास्त मदत काय करता येईल याचा आराखडा तयार केला जातोय. अमित शहांनीसुद्धा लागेल ती मदत केंद्र देण्यास तयार असल्याचं सांगितलं. टीका करणाऱ्यांनी एकदा आरशात बघा. त्यानंतर आमच्यावर टीका करता. आम्ही टीकेची पर्वा करत नाही. आम्हाला खुर्च्य तोडायला नाही तर शेतकऱ्याची सेवा करायला पाठवलंय. ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.