गुजरातच्या राजकारणात मोठी घडामोड, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे
अहमदाबाद : खरा पंचनामा
गुजरातच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्त्वाखालील सध्याच्या मंत्रिमंडळाने अचानक सर्व सदस्यांचे राजीनामे सादर केले. हे राजीनामे केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर घेण्यात आले असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकदरम्यान वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांना हा निर्णय समजावून सांगितला. यानंतर सर्व मंत्र्यांनी आपापले राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सुपूर्द केले. सुरुवातीला अंदाज व्यक्त केला जात होता की, १२ मंत्री राजीनामा देतील, मात्र मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत.
राज्यातील राजकीय विश्लेषकांच्या मते, या सर्व राजीनाम्यांचा उद्देश कॅबिनेट विस्तार करण्याशी संबंधित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज रात्री राज्यपालांची भेट घेऊन मंत्र्यांचे राजीनामे त्यांच्या हाती सुपूर्द करतील.
अद्याप भाजप किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे की, नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या, शुक्रवारी सकाळी साडे ११ वाजता, गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे पार पडेल. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे, या शपथविधीनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल नवीन मंत्रिमंडळाचा आकार निश्चित करतील आणि आगामी काळात गुजरातमध्ये राजकारणाची दिशा ठरवली जाईल. राजकीय वर्तुळात यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत, मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुजरातमध्ये सध्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेणे ही खूप मोठी आणि ऐतिहासिक घडामोड मानली जात आहे. आता पुढील काही दिवसात नव्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे आणि आगामी कॅबिनेट विस्तारावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.